शुक्रवार, २४ ऑक्टोबर, २०२५

टीईटी अर्ज भरला नाही घाबरू नका,आता ही परीक्षा देऊ शकता.

 केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2025, येथे पहा
October 24ऑक्टोबर, 2025 
CTET December 2025 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) लवकरच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) डिसेंबर २०२५ साठीची अधिसूचना जाहीर करणार आहे. या परीक्षेची लाखो उमेदवार आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना ती सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर — ctet.nic.in — येथे पाहता येईल. सीटीईटी परीक्षा नेहमीप्रमाणे दोन टप्प्यांत घेतली जाणार असून, पेपर १ इयत्ता १ ते ५ वीच्या शिक्षकांसाठी आणि पेपर २ इयत्ता ६ वी ते ८ वीच्या शिक्षकांसाठी असेल. पात्र उमेदवारांना केव्हीएस, एनव्हीएस, आणि एपीएस सारख्या केंद्रीय संस्थांमध्ये नोकरीची संधी मिळू शकते.

सीटीईटी तसेच महाराष्ट्र मधील टीईटी या दोन्ही परीक्षा समक्ष आहेत.
    दोन्हींचे गुण तसेच या शिक्षक पात्रता परीक्षा आत्ताच एक सप्टेंबर च्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आरटीआय 2009 नुसार शिक्षक पात्रता परीक्षा दोन वर्षांमध्ये पात्र होणे बंधनकारक केलेले आहे.


सीटीईटी अधिसूचना आणि परीक्षा वेळापत्रक

CTET परीक्षा दरवर्षी दोन वेळा — जुलै आणि डिसेंबरमध्ये CBSE द्वारा आयोजित केली जाते. याचा मुख्य उद्देश देशभरात योग्य आणि प्रशिक्षित शिक्षकांची निवड करणे आहे. या परीक्षेद्वारे सरकार उमेदवारांची शैक्षणिक क्षमता, आकलन आणि शिकवण्याची योग्यताही तपासते. CTET राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा आहे, जी शिक्षक भरतीसाठी किमान आवश्यक योग्यतेचे प्रमाण ठरवते. परीक्षा दोन पेपरमध्ये होतात: पेपर १ (प्राथमिक शिक्षक) आणि पेपर २ (उच्च प्राथमिक शिक्षक). प्रत्येक पेपरमध्ये १५० गुणांची प्रश्नावली असते आणि किमान ६०% गुण मिळवणं आवश्यक असतं.
प्राथमिक शिक्षक होण्यासाठी पात्रता

प्राथमिक स्तरावर शिक्षक होण्यासाठी उमेदवारांची खालील पात्रता असावी लागते उमेदवारांनी १२ वी मध्ये किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण झाले असावे. त्यानंतर त्यांना ‘डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन’ (D.El.Ed) या दोन वर्षांच्या कोर्सची शिकवणी पूर्ण केलेली असावी. किंवा १२ वी मध्ये ५०% गुणांसह चार वर्षांचा B.El.Ed कोर्स पूर्ण केलेला असावा. तसेच, १२ वी मध्ये ५०% गुणांसह दोन वर्षांचा ‘डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन’ (विशेष शिक्षण) कोर्स देखील पूर्ण केलेला असावा. याशिवाय इतर कोणत्याही शैक्षणिक पात्रतेचा विचार केला जात नाही.
उच्च प्राथमिक शिक्षकासाठी पात्रता

जे उमेदवार इयत्ता ६ ते ८ साठी शिक्षक होऊ इच्छितात, त्यांच्यासाठी खालीलपैकी एक पात्रता अनिवार्य आहे. उमेदवारांनी कोणत्याही विषयात पदवी (Graduation) घेतलेली असावी, सोबत डी.एल.एड. किंवा ५०% गुणांसह बी.एड. ही पात्रता असावी. त्याचप्रमाणे, १२वी मध्ये ५०% गुणांसह चार वर्षांचा बी.एल.एड. किंवा बी.ए./बी.एस्सी.एड. किंवा बी.ए.एड./बी.एस्सी.एड. हा पर्याय देखील मान्य आहे. तसेच, पदवी मध्ये ५०% गुणांसह विशेष शिक्षणासाठी बी.एड. देखील योग्य मानली जाते. यामध्ये विविध शैक्षणिक पात्रतेचे पर्याय उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत.

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन

सीटीईटी डिसेंबर २०२५ साठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने केली जाईल. उमेदवारांनी ctet.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन “Apply Online” लिंकवर क्लिक करावी. नवे उमेदवार नोंदणी करून अर्ज क्रमांक मिळवू शकतात. अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक, शैक्षणिक आणि संपर्क माहिती भरा, आणि फोटो व स्वाक्षरी अपलोड करा. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे भरा. अर्ज सबमिट केल्यानंतर, कन्फर्मेशन पेज डाउनलोड करून त्याची प्रिंट आउट घेणे आवश्यक आहे.

 
परीक्षा पद्धती आणि CTET प्रमाणपत्र

परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाऊ शकते, याबाबत निर्णय CBSE घेईल. प्रवेशपत्र (Admit Card) संबंधित नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर काही आठवड्यांनी उपलब्ध होईल. परीक्षेत एकूण १५० प्रश्न असतील, आणि प्रत्येक प्रश्नाचे मूल्य १ गुण असेल. नकारात्मक गुणांकनाचा (Negative Marking) उपयोग केला जाणार नाही. उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना CTET प्रमाणपत्र दिले जाईल, जे आयुष्यभरासाठी वैध राहील. याआधी CTET प्रमाणपत्र ७ वर्षांसाठी वैध होते. हा बदल विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो.

सोमवार, २० ऑक्टोबर, २०२५

बीड मधल्या शेतकऱ्यांची दिवाळी

#Beed
#कष्ट 
#कापूस_शेतकरी 
#गेवराई
      माझ्या तालुक्यात माझ्या गावात दरवर्षी दिवाळी अशीच साजरी होते. किराणा भरून असतो, फटाक्यांची वाट सर्वजण पाहत असतात, नवीन कपडे, पण तो शेतकरी त्याला सर्व आर्थिक नियोजन लावायचं असतं, आपल्या लेकराला आपल्या कुटुंबाला दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी कसाबसा वेळ आणि पैसा या दोन्हींचं देखील खूप काटेकोरपणे नियोजन लावावं लागतं. 
         अंधार पडल्यानंतर रस्त्याने कापसाचे भोत भरून जात असताना ह्या बैलगाड्या बघितल्या आणि मला माझे लहानपणापासूनचे दिवस आठवले. 
       कापसा वाला शेतकरी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस पडल्यापासून ते उन्हाळ्यापर्यंत एक दिवस देखील कसली उसंत न घेता फक्त कष्ट करताना मी पाहिला.
आमचा बीड जिल्हा तसा दुष्काळग्रस्त. 
इथली शेती बहुतांश कोरडवाहू जिरायती थोडीफार शेती जिथे दरवर्षी विहीर आणि बोर घेऊन शेतकरी आणखी नाही मोठी आशा घेऊन पाण्यासाठी प्रयत्न करतो न थकता न बोर होता. शेतीतून मिळालेला शिल्लक राहिलेला थोडाफार पैसा तो शेतातील पाण्यासाठी खर्च करताना बघितला आहे. 
      इथला शेतकरी आपल्या लेकरांना शिकवण्यासाठी देखील पैसा खर्च करतो, शिक्षण खूप महागले आहे, बीड जिल्हा हा देव देवळांचा जिल्हा आहे परंतु हॉटेल धाब्यांचा देखील जिल्हा झालेला आहे. व्यसनाधीनतेचे प्रमाण देखील खूप वाढलेले आहे. 
       बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, लग्न न होणे, असे अनेक प्रश्न न सुटणारे प्रत्येकाच्या समोर उभे आहेत. 
       प्रत्येक पिढीला या प्रश्नांना सामोरे जावं लागत आहे. बीड जिल्हा उद्योग धंद्यांमध्ये पुढे जाऊ शकत नाही कारण इथे राजकारण आणि राजकीय नेत्यांच्या सभांचे केंद्र बनले आहे. इथली सामाजिक व्यवस्था संपूर्णपणे कोलमडून जात आहे. 
        इथल्या कष्टकरी शेतकरी कामगारांचे प्रश्न आजपर्यंत सुटले नाही आणि इथं त्यावर कोणी चकार शब्द देखील काढत नाही. 
      बीड जिल्ह्यातील तसेच माझ्या गेवराई तालुक्यातील सर्व कष्टकरी जनतेला या दिवाळीला आणि पुढील प्रत्येक दिवाळीला माझ्याकडून तेजोमय आणि मंगलमय शुभेच्छा.

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०२५

आरक्षण आणि शिक्षण



     

आज महाराष्ट्रामध्ये जो जातीसाठी,प्रवर्गासाठी आणि आरक्षणासाठी सरकारच्या विरोधात सर्वांनी एकत्रित येऊन जाब विचारण्याऐवजी आपापसात भांडत आहेत.

     महाराष्ट्र एक सुसंस्कृत , विकसनशील राज्य आहे. महाराष्ट्रामधील शेतकरी कष्टकरी वारकरी बहुतांश गोरगरीब जनता या ठिकाणी राहते.
         आज इथे प्रत्येक जण जातीच्या चष्म्या मधून एकमेकांना पाहत आहे. 
      आज कित्येक दशकांपासून सरकार नोकर भरती करत नाही. सर्व नागरिकांचे काय म्हणणे असते तर आपल्याला आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करून एक चांगलं जीवन जगता यावं आपल्या कुटुंबांने अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा असे कोणाला वाटत नाही. 
     महाराष्ट्रात राहणाऱ्या नव्हे स्वतंत्र भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचं कर्तव्य सरकारची नाहीये का?
          भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अमृत महोत्सव झाल्यानंतर तब्बल 75 वर्षानंतर बीडला रेल्वे येते महाराष्ट्राचे मध्यवर्ती ठिकाण. ऊस कापूस तूर सोयाबीन इथले मुख्य पीक इथे बाजारपेठ नाही ना उद्योगधंदे बेरोजगार तरुणांचा हा बीड जिल्हा तरीदेखील इथे एकच काम शिकणे. लाज वाटली पाहिजे इथल्या राज्यकर्त्याला इतक्या उशिराने रेल्वे येते थाटामाटा मध्ये मुख्यमंत्री त्याचे उद्घाटन करतात पण पुढे काय? इथल्या जनतेला एकच वाटते यांच्यापेक्षा इंग्रज बरे होते. कारण ते आमचे नव्हते ते इथले नव्हते पण त्यांनी महाराष्ट्रामध्ये धरण बांधली ,रेल्वे आणल्या, मात्र इथले फुले शाहू आंबेडकर चळवळीचे म्हणून घेणारे पुरोगामी विचार सांगणारे बोल घेवडे काय करतात?
     वाटतील ते शिक्षण घेऊन नोकरी लागावी यासाठी संपूर्ण आयुष्य घालवणारे पिढ्यानपिढ्या इथे जन्म घेतात आणि मरतात.
        इथे अनेक राजकीय घराणे राज्य करत आहेत. मराठवाड्यामध्ये विशेषता बीड जिल्ह्यामध्ये शिक्षण संस्था आणि शिक्षण यासाठी लाखो रुपये खर्च करणारे लोक आहेत. एलकेजी युकेजी साठी एवढा भरमसाठ खर्चा असावा? 
      मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार असा कायदा करणाऱ्या सरकारने कुठे मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले? 
         आज जो तो आरक्षण मागत आहे, ते कशासाठी? 
      आरक्षण सर्वात आगोदर मुलांना शिकवण्यासाठी येणारा खर्च वाचावा म्हणून असावे वाटते. अहो इथलं कोणत्याही शाळेतलं आणि कॉलेजमधलं शिक्षण मोफत करा. आरक्षणाचे फायदे कोणालाच मिळणार नाहीत. कारण इथे शिक्षण घेण्यासाठी इथल्या शिक्षण संस्था ह्या सरकारच्या नाहीत तर सरकार चालवणाऱ्याच्या आहेत.
     तुम्हाला आरक्षण प्रत्येकाला मिळाली तरी काही ना काही फीस ही भरावीच लागणार आहे. 
शिक्षण घेण्यासाठी जो की मूलभूत अधिकार आहे आणि माणसाची मूलभूत गरज सुद्धा तर सरकारने यासाठी ती स्वतःची जबाबदारी आहे हे भानावर येऊन आनंदाने उचलावी. 
     इथून पुढे लोकांनी आपापसामध्ये भांडण करणे सोडून देऊन सरकारला धारेवर धरा.
      संविधानाला सर्वोच्च मानणारे आपले राज्यकर्ते हे खूप नैतिक पणे त्या संविधानाची शपथ घेऊन त्याची अंमलबजावणी करतात की पायदळी तुडवतात हे तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघत असून सुद्धा तुम्हाला कसे काय  काहीच वाटत नाही.
      आरक्षण हे तर गरजवंतांना द्याच पण सर्व शिक्षण सर्वांना मोफत करा. त्या त्या शिक्षणाानुसार त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून द्या रोजगार उपलब्ध करून द्या उदगधंदे    निर्माण करा.  
      जनतेने एकच मागणी केली शिक्षण मोफत ते कोणत्याही शाळेत आणि कॉलेजमध्ये तर 50 टक्के भ्रष्टाचार इथेच थांबेल. आज भारतातील कित्येक लोक विदेशात जाऊन शिक्षण घेत आहेत, विदेशात जाऊन नोकरी करत आहेत. 
     चीन सारख्या देशाला आपण नाव ठेवतो तो देश भारतापेक्षा 50 वर्षे पुढे आहे तो फक्त शिक्षणाच्या बळावर. जपान सारखा देश बेचिराख होऊन देखील आज पुढे आहे तो फक्त शिक्षणामुळे.   
    आजही भारतातल्या शिक्षणाची गुणवत्ता ही खूप चांगली आहे फक्त ते मोफत नाही महाग आहे म्हणून जिथे महाग वाटते ते गुणवत्ता पूर्ण लोकांना वाटत आहे. 
       शिक्षण उत्पादनशील प्रयोगशील ,कृतिशील, सृजनशील, गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यासाठी, तसेच संभाषण कौशल्य आणि सहयोग कौशल्य विकसित करण्यासाठी असते आणि ते फक्त आणि फक्त मोफत आणि सक्तीच्या शिक्षणातून होणार आहे.